मुंबई : माझ्याकडे मिलिंद नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही. पण एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे. एकनाथ शिंदेचा तिथे हस्तक्षेप होता अशाही गोष्टी पुढे येत आहेत, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर दर महिना-दीड महिन्याला तिकडे जात होते. शिंदे ज्यांच्याकडे नेहमी जातात त्या अमित शाहांच्या सोबत सुद्धा कॅप्टन खरातचा फोटो आहे. हे सगळे पोलिटिकल सो-कॉल्ड लोक आहेत, या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृहखात्याची आहे. गृहखाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदे यांचं सीडीआर तपासण्याची? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
रुपाली चाकणकरांच्या सीडीआरबाबत अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर आणि खरात यांचे सीडीआर सुद्धा तपासले जावे कारण काही पिडित असं म्हणतात की रात्री दोन-दोन वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या, प्रचंड दबाव आणत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं ते सीडीआर यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की, चाकणकर यांनी खरातला वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का?
चाकणकरांना अटक झाली पाहिजे
गृहमंत्री यांच्याबाबत त्या म्हणाल्या, मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे कदाचित आयुष्यात पहिल्यांदा आज आभार मानलेत, अभिनंदन केले की ही अतिशय उत्तम कारवाई त्यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचा अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते शोषण करणाऱ्या एका लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षाच पाठीशी घालत असेल, तर मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री अशा महिलेला पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, चाकणकरांना अटक झाली पाहिजे.
चाकणकर बाई स्वतः तंत्र-मंत्र विद्या करायच्या
अंधारे यांनी आरोप केला की, चाकणकर बाई स्वतः तंत्र-मंत्र विद्या करायच्या. दोन सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका (बोट) कापून त्यांनी अशा पद्धतीची तंत्र-मंत्र विद्या केली. यासाठी त्यांनी स्पष्ट मागणी केली की, रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना तातडीने अटक केली पाहिजे. तसेच, आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीने चाकणकर आणि खरात यांच्या संपत्तीचे स्रोतही तपासले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. माझ्या पक्षाचा जरी कोणी याच्यात अडकला असेल तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये, कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आणि लेकी-बाळींच्या इभ्रतीचा आहे. या प्रश्नाच्या आड कुठल्याही पक्षाचं राजकारण येता कामा नये असे त्या म्हणाल्या.