कन्नड, (प्रतिनिधी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात लाकडी दांडा, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवार, (दि. २०) रोजी साडेअकरा वाजता ही घटना घडली. वृद्धाचे नाव गुलाब फत्तू शेख (८२ वर्ष, रा. माटेगाव) असे आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर दोघे गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे प्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन जणांना ताब्यात घेतले असून, इतर दोन जणांचा पोलीस पथक असून शोध घेत आहे.
गांवात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी दोन वाजता हिलाल शेख यांच्या घरासमोरील रस्त्यावर फारूख शामद शेख यांच्यासह कुटुंबीयांसोबत जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाला.
शाब्दिक चकमकीनंतर भांडणाचे पर्यावसान हाणामारीत झाले. फारूख शेख यांच्या कुटुंबीयांनी हिलाल शेख (४२), गुलाब फत्तू शेख (८१), आणखी एकावर जीवघेणा हल्ला केला. वयोवृद्ध गुलाब शेख यांच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले. तर वडिलांचा बचाव करण्यासाठी आलेला शेख हिलाल, नातवाला प्रचंड मारहाण करण्यात आली. गुलाब फत्तू शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. २०) रोजी रात्री ११.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेत दुसऱ्या गटातील रिजवाना फारुख शेख ही महिलाही जखमी झाली. या प्रकरणी हिलाल गुलाब शेख यांच्या फिर्यादीवरून फारुख शामद शेख, इफरोज शामद शेख, फरदीन फारुख शेख आणि रिजवाना फारुख शेख या चौघांविरुद्ध देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
२१ नोव्हेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली. उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे.













