नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या राज्यांत आता विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय प्राप्त केल्यानंतर आता भाजपाने या राज्यांतील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपासमोर असणार असून, पश्चिम बंगालचा कित्ता पंजाबमध्ये गिरवण्यासाठी उत्सुक आहे. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक या राज्यांचा दौरा करणार आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या राज्यामध्ये २०२७ च्या सुरुवातीला निवडणुका होतील, असे म्हटले जात आहे. २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचा दौरा करण्याच्या तयारीत आहे. या पथकानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन निवडणूक आयुक्त या पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. हा दौरा या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. पथकातील अधिकाऱ्यांची नावेही निश्चित झाली आहेत, असे सांगण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घेणार आढावा
चार अधिकाऱ्यांचे हे पथक प्रत्येक राज्याला भेट देईल आणि सर्व जिल्ह्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), जिल्हाधिकारी (डीएम) व अधीक्षक (एसपी) तसेच इतर विभागांतील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेईल. यामध्ये प्रत्येक राज्यातील सद्यस्थितीतील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती, तसेच संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांविषयी माहिती गोळा केली जाईल. राज्यांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संख्या आणि त्यांची किती आवश्यकता आहे, याचेही मूल्यांकन केले जाईल. प्रत्येक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन निवडणूक आयोगाच्या या विशेष पथकासमोर आपले सादरीकरण करतील. निवडणुका घेण्यासाठी किती पोलीस दलाची आवश्यकता असेल हे निश्चित केले जाईल. याबाबतची माहिती हे पथक निवडणूक आयोगाला सादर करेल.
कोणत्या राज्यांत किती टप्प्यांत निवडणुका होणार? तारखा...
या माहितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त पाच राज्यांचा दौरा करतील. त्यानंतर निवडणुकीच्या तारखा आणि टप्पे जाहीर केले जातील. उत्तर प्रदेश आणि मणिपूर वगळता पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथे निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येतील. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका दोन किंवा तीन टप्प्यांत घेतल्या जाऊ शकता. या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ४०३ विधानसभा जागा आहेत.
दरम्यान, मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता या ठिकाणी निवडणुका दोन टप्प्यांत घेतल्या जाऊ शकतात, असा कयास आहे. निवडणुका घेण्यासाठी आयोगाला किती पोलीस दल उपलब्ध होऊ शकते, यावर ही बाब अवलंबून असणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची पुरेशी संख्या उपलब्ध असेल, तर मणिपूरमध्ये निवडणुका एकाच टप्प्यातही घेतल्या जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.