औरंगाबाद: गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार माजी खा. चंद्रकांत खैरे यांना यंदा लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला. मतदारांच्या मतांची आकडेमोड करत असतानाच विजयाचा डंका आपलाच वाजणार या भ्रमात असलेले खैरे यांना यंदा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत झालेल्या जाती-पातीच्या राजकारणाने निवडणुकीत वेगळेच रंग दिसून आले. त्याचा परिणाम आता सर्वत्र कार्यकर्त्यांमध्येही पश्चाताप होताना दिसून येत आहे. यंदा दिल्लीतील निवडणूक आणि गल्लीतील प्रश्न समोर ठेवून एकमेकांवर टीका केल्याचे चित्र दिसून आले. इतकेच नव्हे तर त्यात जातीपातीने घोळ केला आणि शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला अन विजयाची माळ एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या गळ्यात पडली. परंतु येणार्या काळात विकास साधणार कसा हासुद्धा मुद्दा समोर येत आहे.
1985 च्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठकेर यांनी शिवसेनेला मजबूत ठेवण्याचे काम केले. औरंगाबादेत शहरवासीयांनी अनेक दंगली पाहिल्या. त्यानंतरच्या काळातही झालेल्या अनेक आंदोलने, दंगली, मोर्चामुळे शहराची ओळख अतिसंवेदनशील शहराच्या यादीत झाली. मागील वर्षीदेखील कचर्याच्या प्रश्नामुळे शहराला दंगलीचे स्वरुप आले होते. तसेच कचर्याच प्रश्न, पाणीप्रश्न, रस्तच्याच्या समस्या या शहरातील छोट्या-छोट्या समस्या समोर ठेवून राजकारण करण्यात आले. याच प्रश्नांवर एकमेकांवर टीका केल्या गेल्या. त्याच प्रभाव निवडणुकीत वेगळेच चित्र बघायला मिळाले. बहुजन वंचित आघाडी स्थापन करुन प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओवेसी यांनी युती करत एमआयएमचे उमेदवार म्हणून आ. इम्तियाज जलील यांना खा. खैरे यांच्या विरोधात उभे केले. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार म्हणून आ. सुभाष झांबड हे निवडणुकीत उतरले. तर शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी निवडणुकीत उडी घेतली आणि प्रत्येक जाती-पोटजातीतील मतदारांनी सामाजिक प्रश्न, विकासात्मक प्रश्न समोर न ठेवता मतदान केले. तसेच निवडणूक दिल्लीची आणि प्रश्न गल्लीतलेच घेऊन तीस वर्षांत सेनेने काय केले? त्याने काय केले...? अशी एकमेकांवर टीका करत मत मिळविण्याचे प्रयत्न केला आणि दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ झाला असल्याचे चित्र दिसून आले.
कार्यकर्त्यांबरोबर मतदारांनाही होतोय पश्चाताप.....
औरंगाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालात न भूतो न भविष्यत असा निकाल समोर आला. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी खैरे यांचा पराभव करत 3 लाख 89 हजार 42 मते घेऊन विजय मिळविला. यंदाच्या निवडणुकीत केवळ जातीपातीवर आधारितच मतदान करण्यात आल्याची सर्वत्र जोरदार चर्चा केली जात आहे. अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले हर्षवर्धन जाधव यांना अप्रत्यक्षपणे त्यांचे सासरे जालन्याचे विद्यमान खा. रावसाहेब दानवे यांनी मदत केल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर हिंदूच्या जाती-पोटजातीतील मतदारांच्या मतांचे विभाजन होऊन दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ झाल्याचे बोलेले जात आहे. तसेच गेल्या 20 वर्षांत शहराचा विकास न करता समांतर आणि कचर्याचा प्रश्न कायम आहे. त्याचाच परिणाम निवडणुकीत झाला असल्याचेही बोलले जात असून कार्यकर्ते मतदारांकडूनही पश्चाताप व्यक्त केला जात आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याकडे त्यामुळे दुर्लक्ष झाले असल्याचीही खंत व्यक्त होताना दिसत आहे. त्याचाही मतावर परिणाम दिसून आला. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीवरही याचा परिणाम होणार काय? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीतसुद्धा जाती-पातीच्या राजकारणात युतीचे उमेदवार अडकले तर या शहराचा चेहरा वेगळाच बघायला मिळू शकतो. विद्यमान खा. जलील यांनी विजयानंतर शहराच्या विकासावरच भर द्यायला हवा. तसे जलील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, केंद्रात 353 खासदारांचे बहुमत असलेले युती सरकार आल्याने आणि यानंतरच्या निवडणुकीत राज्यातही युतीचे सरकार आल्यास आ. जलील यांना विकास कामे करण्यासाठी निधी आणता येईल का? शहराच्या विकास कामात युतीचे सरकार साथ देतील का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबरोबरच पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे सेनेची फळी मजबूत ठेवण्यात कितपत यशस्वी ठरतात हेसुद्धा येणार्या काळात स्पष्ट होईल.