महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जाहीर; मतदान किती तारखेला? पवार, आठवलेंची जागा रिक्त

Foto
मुंबई: महाराष्ट्रातील सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने या सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यसभेच्या या जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून १६ मार्च रोजीच सायंकाळी मतमोजणी होणार आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपणार्‍या खासदारांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार फौजिया खान (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार), खासदार प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), खासदार रजनी पाटील (काँग्रेस), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप) आणि रामदास आठवले या खासदारांचा समावेश आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सात राज्यसभा जागांसाठी आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीची अधिसूचना २६ फेब्रुवारीला जारी होणार असून ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ६ मार्ज रोजी उमेदवारी अर्जांची छानणी होईल. ९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत या सात जागांसाठी मतदान होईल आणि याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.

कसं आहे निवडणुकीचं गणित?

राज्यसभेच्या एका जागेसाठी ३७.५ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. विधानसभेत संख्याबळ जास्त असल्याने या निवडणुकीत सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपचं पारडं जड मानलं जात आहे. संख्याबळानुसार राज्यसभेच्या सात जागांसाठई भाजपला चार जागा, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा आणि शिंदेंच्या शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागू शकतं.

कसं आहे बलाबल?

विधानसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडे १३७ आमदार असून शिंदेंच्या शिवसेनेचे ६० आमदार आहेत, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत. महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे २०, काँग्रेसचे १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे केवळ १० आमदार आहेत.