सिल्लोड, (प्रतिनिधी): देऊळगाव बाजार येथील शेतकरी संजय सदाशिव कुंटे (वय ४६) यांना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १८ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
संजय कुंटे यांना विजेचा धक्का लागल्यानंतर प्रथम सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
तब्बल पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती रुग्णालयाकडून मिळाल्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विकास लोखंडे पुढील तपास करीत आहेत.