पैठण येथील रस्त्यावर विद्युत, दूरध्वनी पोलचा अडथळा

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यावर उभे असलेले विद्युत व दूरध्वनीचे पोल वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर अडथळा ठरत असलेले विद्युत पोल, टेलिफोन पोल टेलिफोनची डीपी काढण्याकडे मात्र नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. 

मात्र हातावर पोट भरणाऱ्या गरिबांचे अतिक्रमण काढले आहे. यामुळे पैठणकर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. पैठण शहरातील मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या महावितरण विभाग व दूरसंचार विभागाने आपल्या मनमानी प्रमाणे रस्त्याच्या मधोमध पोल उभे केलेले आहेत. विद्युत पोल आणि बाजूला झुकलेले टेलिफोन चे पोल, तसेच भर रस्त्यावर लावण्यात आलेली डीपी यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यामुळे विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश आणि पोलची अयोग्य मांडणी यामुळे अपघाताची शक्यता अधिक वाढते. सध्या पैठण शहरातील अतिक्रमण काढण्यात येत असून भर रस्त्यावर उभारण्यात आलेले महावितरण व दूर संचार विभागाचे पोल दुसरीकडे स्थलांतर करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

 रस्त्यावर असलेल्या विद्युत पोल व टेलिफोनचे पोल अतिक्रमण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. मात्र अद्याप प्रत्यक्ष पाहणी किंवा स्थलांतराची कार्यवाही झालेली नाही. स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून रस्त्यातील अडथळा दूर करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.