फुलंब्री, (प्रतिनिधी): येथील पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला. कार्यालयाची वेळ सकाळी ९:४५ ची असताना तब्बल अकरापर्यंत अनेक कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदस्यांनीही पंचायत समिती शासकीय कार्यालय आहे की मोकळं मैदान?, अशा शब्दांत संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी (ता. १९) सकाळी अकराला पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तांदळे व संतोष गाडेकर यांनी पंचायत समिती कार्यालयाला अचानक भेट देत हजेरीपत्रकाची तपासणी केली. यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती
अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. पंचायत समितीतील ५ कर्मचारी गैरहजर आढळले.
तर, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, घरकुल व स्वच्छ भारत अभियान विभागातील २० कंत्राटी कर्मचाऱ्यापैकी तब्बल १० कर्मचारी सकाळी अकरापर्यंत कार्यालयात पोचले नव्हते. नागरिक विविध कामांसाठी सकाळपासून येत असताना कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने त्यांनाही ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सदस्य बाळासाहेब तांदळे व संतोष गाडेकर यांनी संबंधित विभागप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक आहे की नाही, असा प्रश्न कक्ष अधिकाऱ्यांना केला.














