पोलिस बंदोबस्तात सव्वापाच कोटी बँकेत जमा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
डॉन बाबा फर्जन दोरडी याच्या मिटमिटा येथील बंगल्यावर जप्त करण्यात आलेली सव्वा पाच कोटी रुपयांची रोकड अखेर पोलीस ठाण्यातून राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्यात आली. बाबाने गोळा केलेली माया मोजताना बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. ही अवाढव्य रोकड पोलीस ठाण्यातून बँकेपर्यंत नेणे आणि तिची मोजदाद करणे जोखमीचे असल्याने तैनात करण्यात आलेली पोलिसांची तीन पथकेही या प्रक्रियेमुळे अक्षरशः थकल्याचे पाहायला मिळाले.
फर्जनच्या घरावर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात सव्वापाच कोटी रुपये रोख, रायफल आणि सहा हजारांवर जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे सापडली होती. यावेळी जप्त करण्यात आलेली रक्कम कडेकोट बंदोबस्तात छावणी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाने - बुधवारी ही रक्कम छावणी पोलिस ठाण्याच्या शहागंज येथील बँकेच्या शाखेत जमा करण्यासाठी नेण्यात आली. दुपारी दीडपासून सायंकाळी साडेसहापर्यंत केवळ दीड-दोन कोटी रुपयांची मोजणी झाली होती. यावरून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख र आल्याने बँकेचे दोन अधिकारी, चार कर्मचारी अशा सहा जणांची ही रक्कम मोजताना चांगलाच घाम निघाला.
पोलिसांची उडवली झोप
सर्वसामान्यांच्या घरात लाख, दोन लाखांची रोकड असली तरी त्यांची झोप उडते. एक तर राजकीय नेत्यांनी डॉनच्या घरावरील कारवाईवर प्रश्न उपस्थित करीत असल्याने वाद निर्माण झाला. त्यात मागील चार दिवसांपासून एवढी मोठी रक्कम छावणी पोलिस ठाण्यात ठेवलेली होती. सुरक्षेसाठी पोलिस ठाण्यात प्रवेशाचा मुख्य रस्ता साखळी लावून बंद करण्यात आला होता. जेथे सोने, शस्त्र आणि पैसे होते तेथे २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रक्कम बँकेत गेल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
शिलाबाई म्हणते, बाबासोबत लग्न
केअर टेकर शिलाबाई साळवे हिने आपण पाच जणांच्या उपस्थितीत घरातच बाबा फर्जनशी लग्न केले असल्याचा दावा केला आहे. परंतु त्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नसल्याचेही तिने सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. वारंवार बदलणारे दावे आणि मुलांच्या जबाबात त्यांचा केअर टेकर उल्लेख यामुळे आता पोलिसही गोंधळले आहेत. पोलिसांनी 'बाबा'च्या काही नातेवाइकांचे जबाब घेतले, त्यात त्यांनी शिलाबाई या केअर टेकर होत्या. मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करणे, डबा देणे एवढीच जबाबदारी त्यांच्यावर असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











