औरंगाबाद – इंजिनिअरिंगची परीक्षा अवघी
महिनाभरावर आली असताना १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची घटना शहरात
घडली आहे. मागील परीक्षेत कमी गुण आल्यामुळे टेंशनमध्ये असलेल्या गणेश विष्णू
गायके या विद्यार्थ्याने फायनलच्या परीक्षेआधी राहात्या घरी पंख्याला गळफास लावून
घेतला. ही घटना सिडको एन-२ येथील तोरणागड नगरमध्ये गुरुवारी रात्री घडली.
काय आहे प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन-२ येथील तोरणागड येथे राहाणारे पोलिस कर्मचारी विष्णू गायके यांचा मुलगा गणेश गायके (१८) याने गुरुवारी रात्री राहात्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. गणेश गायके हा शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. मागील परीक्षेत त्याला आपेक्षेनुसार मार्क्स मिळाले नव्हते. येत्या महिन्याभरात पुन्हा परीक्षा होती. त्याची तयारी पूर्ण न झाल्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या गणेशने मृत्यूला कवटाळले असल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
बहीण बोलावण्यास गेली, तो पंख्याला लटकलेला
होता
गुरुवारी सायंकाळी ७ वाजता गणेश नेहमीप्रमाणे
संध्याकाळचे जेवण करुन अभ्यासासाठी त्याच्या रुममध्ये गेला होता. थोड्यावेळाने
पोलिस दलात असलेले त्याचे वडील विष्णू गायके नोकरीवरुन घरी आले. गणेश कुठेही दिसत
नव्हता. तेव्हा त्यांनी त्याच्या बहिणीला त्याला बोलावण्यासाठी पाठवले. पहिल्या
मजल्यावर असलेल्या गणेशच्या रुमचे दार लोटलेले होते, बहीणीने दार उघडले तर गणेश
पंख्याला लटकलेला होता. बहीणीने आरडाओरड केली तेव्हा आई-वडील धावत गणेशच्या रुमकडे
आले. त्यांनी तातडीने त्याला फासावरुन खाली उतवले आणि घाटी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र तोपर्यंत
त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
नेहमी हसतमुख असायचा गणेश
गणेश गायकेच्या मित्र आणि शेजाऱ्यांनी
सांगितले, की नेहमी हसतमुख असलेला गणेश हा गायके दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा
होता. परीक्षेचा ताण सहन न झाल्यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असण्याची
शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार एल.पी. राठोड करीत आहेत.










