छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा न्यायालयासमोर पार्क केलेल्या चारचाकीला पोलिसांनी जॅमर लावल्याच्या रागातून संतप्त झालेल्या चालकाने चक्क स्वतःचीच कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे. जॅमर काढण्यासाठी वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप चालकाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाने आपली चारचाकी रस्त्यावर पार्क केली होती. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाला जॅमर लावला. वाहनाला जॅमर लावल्यानंतर चालकाने तो काढण्यासाठी पोलीस तसेच महानगरपालिका प्रशासनाकडे विनंती केल्याची माहिती आहे. मात्र, वारंवार विनंती करूनही जामर काढण्यात आला नाही, असा चालकाचा आरोप आहे.
भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली
जॅमर काढण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने चालक संतप्त झाला. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या कारलाच आग लावल्याचे समोर आले आहे. भररस्त्यात कार पेटवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळातच वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. भररस्त्यात वाहन पेटवल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस आणि महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, चालकाने जॅमर काढण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार विनंती केल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्याने संतापाच्या भरात स्वतःचीच कार पेटवली, असा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे आता स्थानिक पोलीस आणि महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














