छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पदाधिकारी व नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकींना शुक्रवारपासून (दि. १७) प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मनपात जाण्यासाठी दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, अन्यथा चारचाकी पार्क करण्यासाठी जागेचा शोध घेताना मनपाला वळसा घालण्याची वेळ येणार आहे.
नगरसेवकांचे नातेवाइक, कार्यकर्ते आता सुरक्षारक्षकांशी वाद घालू लागल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. काहींनी तर महापालिका कुणाच्या बापाची नाही, अशा शब्दांत
सुरक्षारक्षकांना सुनावले.
महापालिकेच्या मुख्यालयात पार्किंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले असून, त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आता सुरधारक्षक आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू झाले आहेत. आधी पार्किंगसाठी व्यवस्था करावी, नंतरच प्रवेश बंदीचे आदेश काढावेत, अशी मागणी केली जात आहे.
अधिकाऱ्यांची वाहनेही बाहेर...
▶ मुख्यालयात चारचाकी वाहनांनाच प्रवेश दिला जात होता, मात्र वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने, जे नगरसेवक अगोदर देतील त्यांच्याच चारचाकीला प्रदेश दिला जाईल, पार्किंगची जागा फुल्ल झाल्यानंतर नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांनाही प्रवेश दिला जाणार नाही त्यासोबतच आयुक्त, दोन्ही अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अया चारच अधिकाऱ्यांची वाहने आत सोडण्यात येतील, असेही आदेश काढण्यात आले.
नगरसेविकांच्या पतींची अडचण
▶ महापालिकेतील महिला नगरसेवकांपैकी जवळपास ८० टक्के नगरसेविकांचे पती किंवा इतर नातेवाइकच काम पाहतात. तेच महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरवतात. विशेष सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा अशा विशेष बैठकांनाच नगरसेविका महापालिकेत येतात. आता मात्र महापालिकेत चारचाकीत बसून प्रवेश करण्यासाठी नगरसेविका असलेल्या बायकोलाही सोबत आणावे लागणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions