घाटीत आता क्यूआर कोडनेच मिळणार प्रवेश गर्दीवर मिळणार नियंत्रण; वादविवादही टळणार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे दररोज दोन ते अडीच हजार रुग्णांचा राबता असतो. मात्र, बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) तपासणीनंतर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक आणि परिचितांची प्रचंड गर्दी होत आहे.
वार्डात जाण्याच्या याच गडबडीतून घाटीतील वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सातत्याने खटके उडत असून वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
हे टाळण्यासाठी घाटीमध्ये लवकरच क्यूआर कोडयुक्त पासने प्रवेश मिळणार आहे.
यामुळे गर्दीवर नियंत्रण आणि वादविवाद टळणार आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, घाटीत येणाऱ्या प्रत्येक रुग्णास चांगले उपचार देण्याचा मानस आहे. आगामी काळात वॉर्डमध्ये शिस्त आणि शांतता पाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाणार आहे.
याचा फायदा रुग्णासह स्टाफ व डॉक्टर यांना होईल. यासाठी सर्वांनी सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
८ वाजेनंतर सकाळी आवश्यक लोकांशिवाय इतरांना भेटण्यांसाठी जाता येत नाही. दुपारी १२ वाजेनंतर गर्दी होते. यापुढे पास शिवाय रुग्णालयात प्रवेश मिळणार नाही. त्याबरोबरच बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) नोंदणी, तपासणी शुल्क भरणा करण्यासाठीही क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना रांगेत थांबावे लागणार नाही. या पद्धतीमुळे रुग्ण, नातेवाईक यांचा वेळ वाचणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions