विकास हवा, विनाश नको : पर्यावरण प्रेमींचा बुलंद आवाज
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राष्ट्रीय हरित लवादाने संपूर्ण प्रक्रियेवर ताशेरे ओढून नोटीस बजावलेली असतानाही, सार्वजनिक बांधकाम विभागाने दौलताबाद रस्त्यावरील हजारो महावृक्षांची कत्तल सुरूच ठेवली आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात शहरातील विविध संस्था आणि 'आम्ही पर्यावरण प्रेमी मंच'च्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. 'विकास लपून छपून आणि बेकायदेशीरपणे केला जातो का?' असा संतप्त सवाल विचारत, आंदोलकांनी कटर अन्
मशीनच्या आवाजात घोषणाबाजी केली आणि तोडण्यात आलेल्या महावृक्षांना पुष्प अर्पण करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.
ऑक्सीजन मास्क, फुलं, हार आणि 'विकास हवा, विनाश नको हा नारा. डोन्ट कट ट्री हा संदेशही देण्यात आला. अनेकांचे डोळे पाणावले होते. आम्हाला झाडांचे महत्व कळते, तुम्हाला का नाही ? हा सवाल चिमुकल्यांनी उपस्थित केला. आम्ही लढत आहोत, लढत राहू, विकासाला विरोध नाहीच, असूच शकत नाही.
उठसूट झाडे काय तोडता ?
डॉ. किशोर पाठक, रवी चौधरी यांनी याआधी पुनर्रोपण फसवे ठरल्याची आठवण करून दिली. यावेळी अॅड. निरंजन देशपांडे, प्रीती शाह, निधी पंत, रजनी सेठी, उद्योजक शिरीष कुलकर्णी, मनोज शहा, महादेव कल्याणी यांचीही उपस्थिती होती. प्रयास, औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), उलुलू, इको सत्व या संस्थांनी सहभाग नोंदवला. किती वर्षे आपण रूंदीकरणाच्या नावावर विध्वंस करणार, रुंदीकरणही किती हवे, त्याने अपघात कमी होतात का, सार्वजनिक वाहतुकीसाठी आम्ही वर्षभर झगडतोय. आता कुठे थोडे यश दिसतेय. ती अधिक मजबूत करा. उठसूट झाडे काय तोडता. असा प्रश्न रूपेश कलंत्री यांनी उपस्थित केला.
पण विध्वंस सहज स्वीकारणार नाही, असा संदेशही यावेळी देण्यात आला. रूपेश कलंत्री यांनी उपस्थितांना माहिती दिली. कोट्यवधींचा खर्च, झाडांच्या
कत्तलीने मोजता न येणारे नुकसान करूनही, पडेगाव येथे कोंडीच होणार असल्याचे त्यांनी जोर देऊन स्पष्ट केले. लष्कराने आपली जागा दिलेलीच नाही. त्या भागात पूर्ण
रूंदीकरण होणार नाही. त्यामुळे ६० मीटर भव्यतेच्या हव्यासापोटी कधीही भरून न निघणारे नुकसान करून काय साध्य करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सा.बा. विभागाने आधी केलेला ३० मीटर रोडचा प्रस्ताव स्वीकारला तर आर्धी झाडे वाचतील आणि रस्ता रुंदीकरणही होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.















