औरंगाबाद : कित्येक दशकाची आकडेवाडी मोडीत काढत तापमानाने यावर्षी विक्रमाचे मजले चढवले आहेत. काल शहराचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअस वर जाऊन पोहोचले. आजही तापमान काकणभर वाढच नोंदवली गेली सकाळी साडेअकराच्या सुमारास तापमानाचा पारा ४१.१ डिग्री सेल्सिअसवर होता. त्यामुळे दुपारी यात किमान २.७ अंश सेल्सिअसची वाढ अपेक्षित आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्वचा भाजणाऱ्या तापमानाने शहरवासीयांना हैराण केले आहे. काल दिवसभर उष्णतेने शहरवासीयांना अक्षरशः भाजून काढले. रात्रीही तापमानाचा पारा ३० सेल्सियसच्या पुढे होता.
हवामानाच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे. त्यामुळे आजचा दिवसही भयंकर उष्णतेचा राहील, यात शंका नाही. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ४१.१ एवढे तापमान नोंदले गेले. शुक्रवार आणि शनिवारच्या तापमानापेक्षा यात किंचित वाढ झालेली दिसली. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ३९.६ डिग्री सेल्सिअस तापमान होते. शनिवारी त्यात वाढ होऊन ४०.३ सेल्सियसवर तापमान पोहोचले. तर आज तापमान ४१ अंश सेल्सिअसच्याही पुढे नोंदवले गेले आहे. गेल्या तीन दिवसात तापमानात सतत वाढत होत राहिली त्यामुळे आज दुपारी रेकॉर्डब्रेक तापमान राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. सकाळी अकरा वाजे नंतरच रस्त्यावरील वर्दळ कमी होत असल्याचे दिसते. उष्णतेने पंखे कुचकामी ठरत असल्याने कुलरचा वापर वाढला आहे.