माझ्याकडे बंदूक असल्याचे सांगत माजी सैनिकाची माय-लेकाला मारहाण

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मी आर्मीतून सेवानिवृत्त असून, माझ्याकडे बंदूक आहे. जास्त बोलले तर सोडणार नाही, अशी धमकी देत सैन्यातून सेवानिवृत्त व्यक्तीसह त्याच्या कुटुंबीयांनी शेजारी राहणार्‍याला माय-लेकाला रॉडने मारहाण केली. यात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.सुरेश पिराजी बकाल (सेवानिवृत्त, वय ५६), सुरेखा सुरेश बकाल (वय ५०), अनिकेत सुरेश बकाल (वय २७), मोनिका सुरेश बकाल (वय २६, रा. सर्व आमदार रोड, सातारा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत विलास कारभारी अहिरे (रा. आमदार रोड, सातारा परिसर) यांनी तक्रार दिली. ते बुधवारी सकाळी सातला घरात झोपलेले होते. त्यांचे शेजारी सुरेश बकाल त्याची पत्नी सुरेखा, मुलगा अनिकेत, मुलगी मोनिका यांनी झाडाचा पडलेला कचरा विलास यांच्या अंगणात आणून टाकत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर घरात घुसून विलास, त्यांच्या पत्नी अर्चना, मुलगी श्रुती, आई कमल यांना रॉडने बेदम मारहाण केली. तसेच विलास यांच्यावर चाकूहल्लाही केला. यात अहिरे कुटुंबीय जखमी झाले. विलास यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरूशन गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा नोंद होऊ नये म्हणून दबाव
आरोपींच्या नातलगांनीही सातारा पोलिस ठाणे गाठले. तक्रार करू नका म्हणून विलास यांच्यावर दबाव आणला. यानंतर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांच्याही भेटीगाठी घेतल्या; परंतु शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला.