सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्याचे सोमवारी विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार या मुद्द्यावरुन प्रचंड आक्रमक झाले. विधानपरिषदेत शिवसेना मंत्री शंभुराज देसाई यांनी हा मुद्दा उपस्थित करताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश काढले. यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकी घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना आमदारांनी जोरदोरा घोषणाबाजी केली. सातारच्या एसपींचा धिक्कार असो, आमदार-मंत्र्यांना धक्काबुक्की करणाऱ्या एसपींचा धिक्कार असो, अशा घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या. शिवसेना आमदारांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याचे दिसले. या सगळ्यानंतर त्यांनी सभागृहात येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभुराज देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीवरुन ते चिडल्याचे दिसत होते.
या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये हे प्रकरण मिटवण्यासाठी चर्चांच्या फेऱ्या सुरु झाल्या. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचे समजते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यांवरील आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तात्काळ प्रतिसवाल उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या साताऱ्यातील वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली. शिवसेना आमदारांचे पायऱ्यांवरील आंदोलन योग्य नसेल तर मग जयकुमार गोरे वागले ते योग्य आहे का, असा प्रतिसवाल एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याचे समजते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात लवकरच या वादाबाबत बैठक होईल, असे समजते. तसेच दोन्ही पक्षात समन्वय राहावा, यासाठी पडद्यामागे हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले. उपमुख्यमंत्रींनीही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारीच असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आम्ही राजीनामा देऊ अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांने एकनाथ शिंदेच्या समोर बोलून दाखवली. सातत्याने आमची गळचेपी होत आहे यावर बोललं पाहिजे असं आमदार आणि मंत्री म्हणाले.