छत्रपती संभाजीनगर, तडीपार (सांजवार्ता ब्युरो) गुंडाने देवळाई चौकातील किराणा दुकानात धिंगाणा घालत दुकानातील ७५ वर्षीय आजोबांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि काऊंटरवरील ४ हजार रुपयांचे किराणा सामान लंपास केले. तौफिक कालू शेख (३५, रा. देवळाई परिसर) असे या सराईत गुंडाचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्याला १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियान जाकीर ढेकिया (२१, रा. रहेमानिया कॉलनी, आझाद चौक) यांचे देवळाई चौकात रॉयल सुपर शॉपी नावाचे किराणा दुकान आहे. सोमवारी (दि.१०) दुपारी सुफियान
दुकानात असताना ओळखीचा तौफिक शेख तिथे आला. त्याने सुफियानला ४ हजार रुपयांचे सामान काढण्यास सांगितले. तौफिकने वाद घालायला सुरुवात केली. तौफिकने सुफियानच्या ७५ वर्षीय आजोबांना (अरुण ढेकिया) विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करून खाली ढकलून दिले.
आरोपी तौफिक शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याला महिनाभरापूर्वीच तडीपार केले होते; तरीही तो सातारा परिसरात खंडणीसाठी धमक्या देत व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल होताच त्याला अटक केल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक शैलेश देशमुख करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














