बिहारमध्ये धमाका पण पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; 8 पैकी 6 जागांवर पराभव?

Foto
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्याशिवाय 7 राज्यांमधील 8 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती, त्याचेही निकाल आता समोर आले आहेत. राजस्थानच्या अंता मतदारसंघात सत्ताधारी भाजपाला मोठा फटका बसला आहे. याठिकाणी काँग्रेस उमेदवाराने निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसरीकडे झारखंडच्या घाटशिला मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या मुलाने भाजपा उमेदवाराला मागे टाकले आहे.
मिझोरम येथील डम्पा मतदारसंघात मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ. आर ललथंगलियाना 562 मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर झोरम पिपल मूव्हमेंटचे उमेदवार राहिलेत. इथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 1541 मते पडली आहेत. पंजाबच्या तरनतारन येथे आम आदमी पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे. जम्मू काश्‍मीरच्या नागरोटा जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे. बडगाम येथे मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी आघाडीवर आहे. तेलंगणा येथे जुबली हिल्समध्ये काँग्रेस आणि ओडिशाच्या नुआपाडा येथे भाजपा आघाडीवर आहे. एकूण पोटनिवडणुकीच्या 8 जागांपैकी 6 जागांवर भाजपाची पिछेहाट झाली आहे.
राजस्थानात सत्ताधारी भाजपाला झटका
राजस्थानात सत्ताधारी भाजपाला धक्का देणारे अंता विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. 11 नोव्हेंबरला या जागेसाठी 80 टक्के रेकॉर्डब्रेक मतदान झाले होते. ही केवळ एका जागेची पोटनिवडणूक नव्हती, तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती. याठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद जैन भाया रिंगणात होते. अंता मतदारसंघ हाडौती विभागात पडतो, जिथे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा गड मानला जातो. याठिकाणी एक्झिट पोलमध्ये भाजपाला जागा मिळेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात निकालात काँग्रेस उमेदवार विजयी दिशेने वाटचाल करत आहे. 
पंजाबमध्ये पुन्हा आप
पंजाबच्या तरनतारन जागेवर आम आदमी पक्षाचे हरमित सिंग संधू विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या जागेवर आपच्या उमेदवाराला 35 हजार 476 मते मिळाली असून ते 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर शिरोमणी अकाली दलाचे सुखविंदर कौर यांना 23 हजार 800 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरजित सिंग संधू यांना 4 हजार 918 मते मिळाली आहेत.