सिल्लोड, (प्रतिनिधी) : शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी पोळा सण साजरा केला. सिल्लोड येथील त्यांच्या शेतातील बैलांना स्वच्छ आंघोळ घालून सजविण्यात आले. यावेळी बैलांप्रती असलेली आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करत आमदार अब्दुल सत्तार यांनी पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा केला.
यंदा पावसाने ओढ दिल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पोळा सणावरही जाणवत असून, शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सहकारी असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा जपली जात आहे. शेती आणि शेतकरी जीवनात बैलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. आधुनिक शेतीच्या काळात यांत्रिकीकरण वाढले असले, तरी ग्रामीण संस्कृतीत बैलांशी असलेले नाते आजही जिव्हाळ्याचे
आहे.
पोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्वाचा सहकारी असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले. दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना पोळा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, तसेच बळीराजाला चांगले दिवस यावेत, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.














