घोटाळ्याची बातमी देण्याची धमकी देणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Foto
पैठण, (प्रतिनिधी)  : पुर बाधित ग्रामस्थांच्या धान्यवाटपात तुम्ही घोटाळा करत आहात, मला २ क्विंटल धान्य व २० हजार रुपये द्या. अन्यथा पेपरला बातम्या देईन. अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या पत्रकार कलीम करीम पठाण याच्याविरुद्ध पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोदावरी काठावरील कुरणपिंपरी या गावच्या सरपंच रुख्साना कठ्ठू शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

जायकवाडी धरणाच्या आपत्कालीन दरवाजांसह सर्व दरवाजे दि. २८ व २९ सप्टेंबर रोजी उघडून ३ लाखांपेक्षा अधिक क्युसेकचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कुरणपिंपरी या गावात पुरस्थीती निर्माण झाली. प्रशासनाने येथील ग्रामस्थांना माऊली जन्मक्षेत्र आपेगाव येथे स्थलांतरित केले होते. दरम्यान दि. १ ऑगस्ट रोजी शासनाने स्थलांतरीत लोकांसाठी स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य उपलब्ध करून दिले. २८ पोती गहू व २८ पोती तांदूळ यांचे वाटप दि. २ रोजी सरपंच रुखसाना कठ्ठू शेख यांच्या उपस्थितीत सुरू झाले. यावेळी उपसरपंच चाॅंद अकबर शेख, गुलाम रसुल कठठु शेख, रियाज दगडू पठाण, स्वस्त धान्य दुकानदार अमन रज्जाक शेख, कलीम अहमद शेख, नाजीम कठठु शेख व मजीद शामद शेख हेसुद्धा हजर होते.

या पार्श्वभूमीवर गावातील कलीम करीम पठाण याने धान्य वाटपकाम बंद केले.यादीमध्ये तुम्ही बाधित कुटुंबांची नावे चुकिची दिली. कोणाला किती धान्य दिले ? याबाबत विचारणा करत धमक्या दिल्या.त्याला सरपंचांनी माहीती दिली. दरम्यान ६८ वर्षीय महिला सरपंच रुखसाना शेख यांचा रक्तदाब वाढला. त्या गोळ्यांसाठी घरी निघून गेल्या. गोळ्या घेवून परत धान्य वाटपाच्या ठिकाणी त्यांना नेण्यासाठी रियाज दगडू पठाण हे दुचाकी घेऊन आले. सरपंच त्यांच्या दुचाकीवर बसत असतानाच कलीम करीम पठाण हा तेथे आला.

 शासनाकडून आलेल्या धान्यापैकी २ क्विंटल धान्य आणि २० हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर मी तुमच्या विरोधात बातम्या लावेन. तुमच्या विरोधात माहिती अधिकार टाकेन असे म्हणाला. त्यावर सरपंच यांनी 'सदरचे धान्य हे शासनाकडून आले असून त्याचे कायदेशीर वाटप सुरू आहे. तुम्हाला नियमाप्रमाणे जेवढे धान्य आहे. ते आम्ही तुम्हाला दिलेले आहे.' असे म्हणताच आरोपीने धमक्या दिल्या.
 
शिवीगाळही केली. एवढेच नव्हे तर, दि. ३ रोजी धान्य वितरणच बंद करायला भाग पाडले. त्यामुळे तब्बल ५ क्विंटल धान्य शिल्लक राहिले आहे. पुरग्रस्त कुटुंब धान्याशिवाय राहिले. पैठण पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे सदरील इसम हा गावातील नागरिकांच्या तसेच ग्रामपंचायतच्या विरोधात अर्ज फाटेकरून, तक्रारी करून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे