छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरात धडक कारवाई करीत चार आस्थापना सील केल्या आहेत. यामध्ये दोन तेल पुनर्पॅकिंग युनिट, एक मिठाई उत्पादक आणि एका फराळ उत्पादक आस्थापनेचा समावेश आहे. संबंधित आस्थापनांचे परवाने यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. मात्र, निलंबनाच्या कालावधीतही व्यवसाय सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, सील करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये लासूर येथील मेसर्स गुरू गणेश ऑईल रिपॅकिंग युनिट आणि मेसर्स रवी ऑईल रिपॅकिंग युनिट यांचा समावेश आहे. तसेच स्टेशन रोड, एमआयडीसी परिसरातील मेसर्स मधुर मिलन मिठाई उत्पादक आणि शहरातील साई भंडार फराळ उत्पादक या दोन आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. नियम धाब्यावर ठेवून या आस्थापनाने व्यवसाय सुरू ठेवले. त्यांच्यावर एफडीए ने धडक कारवाई केली आहे.
निलंबन करूनही व्यवसाय सुरूच होता
संबंधित चारही आस्थापनांचे निलंबन करण्यात आलेले असतानाही त्यांनी निलंबनाच्या कालावधीत आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. ही बाब गंभीर असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे आणि प्रशांत कुचेकर यांनी संबंधित आस्थापनांवर पाळत ठेवली. त्यानंतर प्रत्यक्ष धडक कारवाई करून चारही आस्थापना सील करण्यात आल्या. या कारवाईमुळे अन्न व्यवसायातील नियमांचे उल्लंघन करणार्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सील करण्यात आलेल्या सर्व आस्थापनांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. निलंबनाच्या आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवणे हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकरणांत कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
व्यवसाय सुरू ठेवल्यास गुन्हे होणार दाखल
निलंबनाचा आदेश असतानाही व्यवसाय सुरू ठेवणार्या आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासह अन्न परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे. अन्न व्यवसाय करणार्या सर्व आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. निलंबनाच्या कालावधीत व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.