अन्न व औषधी प्रशासनाने शहरात अनेक प्रतिष्ठीत खाद्य पदार्थ विक्री करणार्या हॉटेल्ससह ढाबे व इतर आस्थापनांवर कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरात केलेल्या या धडाकेबाज कारवायांची चर्चा असतानाच काल जुना मोंढा जाफरगेट परिसरातील प्रसिद्ध मेसर्स बजरंग ट्रेडिंग कंपनी या ऑईल रिपॅकिंग युनिटची अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल. झाडे यांनी सहकार्यांनी तपासणी केली. तपासणीत अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. त्यानंतर कंपनीतील तब्बल १२ हजार ३८२ किलो खाद्यतेलाचा साठा सील करून पुढील आदेशापर्यंत जप्त करण्यात आला.
सर्वाधिक साठा सोयाबीन तेलाचा...
जप्त केलेल्या मालामध्ये केशर गोल्ड ब्रँडच्या डब्यांतील ४०७.९ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाची किंमत ८५ हजार ९७० रुपये आहे. स्टोरेज टँक क्रमांक सहामधील ७ हजार ९८८.४ किलो सुट्या सोयाबीन तेलाची किंमत १४ लाख ८५ हजार ८४२ रुपये, तर टँक क्रमांक दोनमधील २ हजार ९८८.४ किलो तेलाची किंमत ५ लाख ५५ हजार ८४२ रुपये आहे. याशिवाय ७९ किलो केशर गोल्ड ब्रँड पामोलीन तेल, ज्याची किंमत १७ हजार ६०० रुपये आहे, तेही जप्त करण्यात आले.
स्वच्छतेचा अभाव अन् अनेक त्रुटी...
तपासणीदरम्यान कंपनीला २०६ पैकी केवळ १० गुण, म्हणजेच पाच टक्के गुण मिळाले. त्यामुळे आस्थापना नियमपालनाच्या निकषांवर अपात्र ठरली. इमारतीच्या छतावर कचरा साचलेला, स्वच्छतागृह अस्वच्छ आणि कारखान्याच्या फरशीवर तेल सांडल्याने घसरडी परिस्थिती असल्याचे आढळले. खाद्यपदार्थ आणि पॅकेजिंग साहित्याची अयोग्य साठवणूक करण्यात आली होती. माल जमिनीवर थेट ठेवण्यात आला होता. कीटकांना रोखण्यासाठी खिडक्यांना जाळ्या आणि उंदरांना पकडण्यासाठी आवश्यक सापळे नव्हते. कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नव्हती. तसेच कामगारांकडून डोक्यावरील कॅप, अॅप्रन आणि हातमोजे यांसारख्या सुरक्षा साधनांचा वापर होत नसल्याचे तपासणीत समोर आले.
खरेदीच्या नोंदीही नाहीत
तेलाची गुणवत्ता तपासण्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा किंवा अन्न तंत्रज्ञाची व्यवस्था नसल्याचेही आढळले. खरेदी केलेल्या तेलासंबंधी आवश्यक अधिकृत नोंदी व कागदपत्रे सादर करता आली नाहीत. या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जप्तीची कारवाई करत अन्न परवाना निलंबित केला. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने अशा कारवायांना महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे, असे अन्न व सुरक्षा अधिकार्यांनी स्पष्ट केले.
















