मराठवाडा कोल्ड स्टोअरेजचे परवाने एफडीएकडून निलंबित
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
खाद्यपदार्थांच्या साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने बिडकीन येथील फ्रिओ वेअरहाउसिंग आणि शिवराई येथील मराठवाडा कोल्ड स्टोरेजचे परवाने निलंबित केले आहेत. दोन्ही ठिकाणांहून मिरची पावडर, बेदाणे, गूळ आणि बटरसह सुमारे ४.१८ कोटी रुपये किमतीचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला.
बिडकीन येथील फ्रिओ वेअरहाउसिंगच्या तपासणीत तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा बंद असल्याचे, तसेच स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाची योग्य व्यवस्था नसल्याचे आढळले. येथून ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीची १ लाख ६५ हजार
८०५ किलो मिरची पावडर आणि बेदाणे जप्त करण्यात आले. यामध्ये लेबल नसलेल्या मिरची पावडरचाही समावेश आहे. शिवराई येथील मराठवाडा कोल्ड स्टोरेजमध्ये तापमानाच्या नोंदी ठेवण्याची व्यवस्था, पुरेसा प्रकाश आदी असुविधा आढळून आल्या. येथून ३० लाख ७हजार रुपये किमतीचा ३१ हजार ६७५ किलो गूळ, बेदाणे आणि पाश्चराइज्ड बटर जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या आदेशानुसार दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions