बंगळुरु : कर्नाटकात उपमुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी शड्डू ठोकल्याने सिद्धरामय्यांची खूर्ची संकटात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेतृत्व बदलाची चर्चा शिगेला पोहोचली असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी (22 नोव्हेंबर) बेंगळुरूमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. बैठकीनंतर सिद्धरामय्या म्हणाले की, पक्ष संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांवर चर्चा झाली. ते पुढे म्हणाले, मंत्रिमंडळाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. नेतृत्व बदल हा केवळ अंदाज आणि माध्यमांची निर्मिती आहे.
आमदारांना जाऊ द्या, पण हायकमांड...
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धरामय्या म्हणाले, आमदारांना जाऊ द्या, पण हायकमांड जे काही म्हणेल ते आपण सर्वांनी पाळले पाहिजे. मी असो किंवा डीके शिवकुमार, सर्वांना ते पाळावेच लागेल. हायकमांड कधी निर्णय घेईल याबद्दल सिद्धरामय्या यांनी कोणतेही आश्वासन दिले नाही, ते म्हणाले, जो काही निर्णय लवकरच घेतला जाईल, तो मी पाळेन. खरगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावलं. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, एका गुप्तचर अहवालातून असे दिसून आले आहे की कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय गतिरोधामुळे सरकार आणि पक्ष दोघांचीही प्रतिमा खराब होत आहे. सिद्धरामय्या यांनी राजकीय अस्थिरतेचा सरकारच्या कामकाजावर होणाऱ्या परिणामाची माहिती हायकमांडला दिली. त्याला उत्तर देताना, खरगे यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीवर अधिक चर्चा करण्यासाठी दिल्लीला आमंत्रित केले.
गटबाजी करणे माझ्या रक्तात नाही
दरम्यान, राज्यात नेतृत्वबदलाची चर्चा रंगली असताना डीके यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं सुद्धा सिद्धरामय्या गटात खळबळ निर्माण झाली. गटबाजी करणं माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत, अशी प्रतिक्रिया डीके यांनी दिली. मंत्रिमंडळ फेरबदल आणि मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा शिगेला पोहोचल्या असतानाच डीके यांचे विधान राजकीय अर्थाने गर्भित असल्याची चर्चा आहे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळात फेरबदलाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत भेटीला गेलेल्या आमदारांना मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांची भेट नैसर्गिक आहे, त्यामुळे मी आणखी काय बोलू शकतो? त्यांनाही भेटण्याचा हक्क आहे. मी कोणालाच सोबत घेतलं नसून तेच दिल्लीत खरगे साहेबांना भेटले आहेत.
काँग्रेस हाय कमांड निर्णय घेऊ शकते
दरम्यान, सिद्धरामय्या यांनी पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि सांगितले की जेव्हा जेव्हा बोलावले जाईल तेव्हा ते दिल्लीला येतील. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ते नोव्हेंबरच्या अखेरीस राष्ट्रीय राजधानीत असण्याची शक्यता आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी प्रशासन स्थिर करण्यासाठी आणि पक्षाला बळकटी देण्यासाठी हाय कमांड सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लवकरच निर्णय घेईल.
एचडी कुमारस्वामी यांचा हल्लाबोल
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) संपूर्ण मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर हल्ला करत आहे. केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील स्फोटक राजकीय घडामोडींचा इशारा देत म्हटले आहे की, राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की राजकारणात कोण काय निर्णय घेईल हे सांगणे अशक्य आहे. राज्याच्या राजकारणात स्फोटक घडामोडी घडतील.