जालना : अंतरवाली सराटी (जि. जालना): मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रे वाटप केल्यानंतर ती प्रशासकीय पातळीवर अचानक रद्द केली जात आहेत . या असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. गुरुवारी (दि. ६) अंतरवाली सराटी येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा सरकारचा मराठा समाजाविरुद्धचा मोठा कट असल्याचे सांगत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत.
शिंदे साहेब, तुम्ही इतके आहारी जाल वाटले नव्हते!
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील अत्यंत आक्रमक पवित्र्यात म्हणाले, कालपासून राज्यात एक नवीन कट शिजवला गेला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे द्यायची आणि नंतर ती रद्द करायची, हा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांचा ठरवून केलेला डाव आहे. चंद्रशेखर बावनकुळे यासाठी थेट जबाबदार आहेत. मी गेल्या तीन वर्षांनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत आहे. शिंदे साहेब, तुम्ही इतके इतरांच्या आहारी जाल असे मला वाटले नव्हते. या संपूर्ण कटात भाजपमधील मराठा नेतेसुद्धा सामील आहेत.
फोन करून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करायला लावली!
जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर थेट हल्ला चढवत आरोप केला की, त्यांचा माणूस निवडणुकीत निवडून आला नाही म्हणून बावनकुळे यांनी अधिकार्यांना फोन करून कुणबी प्रमाणपत्रे रद्द करायला लावली. राजकीय द्वेषापोटी तुम्ही ३ हजार मराठा तरुणांना फासावर देणार का? मला माझ्या मराठा मुलांच्या नोकरी आणि शिक्षणासाठी ही प्रमाणपत्रे हवी आहेत. इथे तुमचा एखादा नेता निवडून येईल, पण या राजकीय द्वेषापोटी शिक्षण आणि नोकरीत मराठा पोरांचे अतोनात नुकसान होणार आहे. तुम्ही उगाच मराठे अंगावर घेतले आहेत, माझ्या नादी लागू नका!ङ्घङ्घ असा थेट इशारा त्यांनी दिला.
२०२९ आमच्या हातात आहे...
सरकारच्या या राजकीय भूमिकेमुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने कडक इशारा दिला. २०२९ चे राजकारण पूर्णपणे आमच्या हातात आहे. तुम्ही मराठा समाजाचे जे नुकसान करत आहात, त्याचा आम्ही असा बदला घेऊ की तुमचे बोटावर मोजण्याइतकेसुद्धा आमदार-खासदार निवडून येणार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. तसेच यशवंत दहीहंडे यांची अधिकृत नोंद सापडलेली असतानाही अशी कारवाई केली जात असल्याचे सांगत हा मराठा समाजाचा छळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.