फक्त धान्य वाटून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली; वर्ष उलटले तरी पुरग्रस्तांना न्याय नाही

Foto
पैठण शहरासह तालुक्यातील १४ गावातील शेतकरी
व्यापारी, नागरिक अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत 

रमेश लिंबोरे

पैठण : मागील वर्षी गोदावरी नदीला आलेल्या महापुराने पैठण शहरासह तालुक्यातील १४ गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजविला होता.
हजारो शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली, उभी पिके वाहून गेली. घरांचे नुकसान झाले. तर पैठण शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांतील लाखो रुपयाचे मालाचे नुकसान झाले. या आपत्तीनंतर शासनाने तातडीने नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. 

मात्र, वर्ष उलटूनही अनेक पुरस्ग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. पूरानंतर प्रशासनाने पंचनामे केले. अधिकारी पाहणी करून गेले, लोकप्रतिनिधींनी आश्वासनांची खैरात केली; परंतु प्रत्यक्ष मदतीऐवजी केवळ तात्पुरत्या स्वरूपात धान्य वाटप करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप पुरग्रस्तांकडून केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे कर्जबाजारी शेतकरी आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. 

तर दुसरीकडे व्यापारी अजूनही पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरू शकलेले नाहीत. अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे पुरग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. "आश्वासनांची नव्हे, तर हक्काच्या नुकसानभरपाईची गरज आहे. अशी मागणी पुरग्रस्तांकडून होत आहे. पैठण शहरासह तालुक्यातील १४ गावांतील पुग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, पूरग्रस्तांचा प्रश्न वर्षभर प्रलंबित ठेवणाऱ्या प्रशासनाची जबाबदारी निश्चित होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.