औरंगाबाद: एक दुजे के लिएफ या सुपर-डुपर हिट चित्रपटाने घराघरात पोचलेला आणि भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दक्षिणात्य अभिनेता कमल हसन आज खलनायक ठरतोय. ज्या चित्रपटाने कमल हसनचे आयुष्य पालटले, त्याच चित्रपटात रती अग्निहोत्रीने त्याला उद्देशून वापरलेली झुठा कही का, 420 आणि आवारा म्हटले होते.
ही विशेषणे आज चपखल बसली. गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू आतंकवादी होता, असे म्हणत कमल हसनने दहशतवादाला धर्म चिटकवला. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या देशात अशी कुरापतखोर माणसे म्हणूनच खलनायक ठरतात. प्रचंड विस्तारलेल्या कलाक्षेत्रातील मोजक्याच कलाकारांनी भारतीयांवर अधिराज्य गाजविले. त्यापैकी कमल हसन एक दाक्षिणात्य अभिनेता. अपार प्रसिद्धी आणि पैसा त्याच जोरावर कमल हसनने मिळविला. वर्षभरापूर्वी त्याने मक्कल नीधी मैयम या पक्षाची स्थापना केली आणि दक्षिणेत राजकीय क्षेत्र ढवळून काढले. सुपरस्टार रजनीकांत नंतर सर्वाधिक लोकप्रिय कलाकार म्हणून कमल हसनकडे पाहिले जाते. आपल्या पक्षाचा जनाधार वाढविण्याच्या लालसेपोटी चेन्नईतील एका प्रचार सभेत त्याने अशी मुक्ताफळे उधळली. नथुराम गोडसे चे समर्थन कुणीही करणार नाही. त्याला अतिरेकी म्हणा नाहीतर दहशतवादी! मात्र हिंदू धर्मावर चिखलफेक करण्याचा अधिकार कमल हसनला नाही, असा सूर आता उमटत आहे. राजकीय क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे, म्हणूनच अगदी बोटावर मोजता येणारे कलाकारच या क्षेत्रात यशस्वी ठरले. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देशासमोर आहेच. त्यामुळेच एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाने आणि सुपरस्टार अभिनेत्याने काढलेले हे उद्गार संतापजनकच आहेत !