गंगापूर, (प्रतिनिधी): शेतजमिनीच्या वाटणीवेळी पैसे दिले नाहीत, या कारणावरून मोठ्या मुलाने आई-वडील तसेच लहान भाऊ व भावजयला शिवीगाळ करीत लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केल्याची घटना गंगापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिताराम भानुदास सरोदे (वय ५०, रा. पुरी ता. गंगापूर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सरोदे यांना दोन मुले असून त्यांच्याकडे सहा एकर शेतजमीन आहे. त्या जमिनीची दोन्ही मुलांमध्ये प्रत्येकी तीन एकर अशी वाटणी करण्यात आली होती. फिर्यादी हे पत्नीसमवेत लहान मुलाकडे राहत आहेत. मात्र, वाटणीच्या वेळी पैसे दिले नाहीत, या कारणावरून मोठा मुलगा राजू सरोदे हा नेहमी वाद घालत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
रविवार (ता. १७) रोजी दुपारी वडगाव कोल्हाटी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे नातेवाईकांच्या घरी कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. मात्र, बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने वाद कायम राहिला. यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी राजू सरोदे, त्याची पत्नी शिवकन्या सरोदे तसेच पवन विष्णू खोलासे, मोहन विष्णू खोलासे व विष्णू खोलासे (रा. हदगाव, ता. पैठण) हे आले. त्यांनी घरासमोर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी व कुटुंबीय बाहेर आल्यानंतर लहान मुलगा दिनेश सरोदे व सून निकिता यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सिताराम सरोदे यांच्यावर पवन खोलासे याने लोखंडी गजाने डोक्यात वार केला. तसेच मोहन खोलासे याने लोखंडी गजाने दोन्ही हातांवर मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादी यांच्या पत्नी आशाबाई यांनाही शिवीगाळ करीत चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण सोडवले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मनोज घोडके व त्यांचे सहकारी करीत आहेत.















