भूवनेश्वर : 1999च्या सुपर चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे फनी वादळ आज, शुक्रवारी ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. या चक्रीवादळाचा ताशी वेग 185 किमी इतका होता. मात्र काही वेळानंतर त्यात वाढ होत तो 240 प्रति किमी इतका झाला आहे. ओडिशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात पावसालाही सुरुवात झाली आहे पुरीच्या किनारपट्टीवर अनेक झाडे कोसळल्याचे वृत्त आहे. यात पुरीमधील सखीगोपाळ भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ओडिशात 5 ते 6 तास वादळाचा परिणाम जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ओडिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वार्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे मनुष्यहानी टाळता यावी यासाठी राज्याच्या समुद्रकिनार्याच्या आसपास राहणार्या सुमारे लाखो नागरिकांना तेथून स्थलांतरित करण्यात आले आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या संदर्भात दिलासा देणारे वृत्त म्हणजे या चक्रीवादळाचा वेग सकाळी 11 वाजल्यानंतर मंदावणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळामुळे निर्माण होणार्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून केंद्रीय गृहमंत्रालयाने 1938 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला.
95 गाड्या रद्द
’फनी’च्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवसांत सुमारे 95 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द किंवा अन्य मार्गांवर वळवण्यात आलेल्या गाड्यांतील प्रवाशांनी निर्धारित वेळेनंतर तीन दिवसांत पैशाची मागणी केल्यास त्यांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. रेल्वेने बुधवारी 81 गाड्या रद्द केल्या होत्या.
’एनडीआरएफ’ची 81 पथके तैनात
’फनी’च्या तडाख्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती कृती दलाची (एनडीआरएफ) 81 पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागांत जवळपास 50 पथक यापूर्वीच सज्ज करण्यात आली आहेत, तर अन्य 31 पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये चार हजारहून अधिक विशेष कर्मचार्यांचा समावेश आहे, असे ’एनडीआरएफ’चे प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले .