पैठण, (प्रतिनिधी): भक्ती, उत्साह आणि भावनेने दुमदुमलेल्या वातावरणात गणपती बाप्पाला शुक्रवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. काही दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गणरायाच्या विसर्जनाने झाली.
ढोल ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याफ्च्या जयघोषात गणेशभक्तांनी बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती. गुलालाची उधळण, फुलांची सजावट आणि भक्तांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
विसर्जनाच्या वेळी अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांनी सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत, बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या असा भावनिक निरोप देण्यात आला.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रशासन व स्वयंसेवकांच्या सहकार्याने विसर्जनाची प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली.














