सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात निरोप समारंभ उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. पालोदचे मुख्याध्यापक दिलीप सपकाळ सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून विद्याथ्यर्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लॉजिक कंप्यूटर चे संचालक जितेंद्र पाडवे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त, संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतघ्नता व्यक्त केली. निरोप घेताना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा, वकृत्व स्पर्धा, विविध खेळातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दहावी बारावीच्या विद्याथ्यांनी शालेय जीवनातील आठवणी जागृत केल्या, व आठवण स्वरूपामध्ये शाळेला भेट वस्तू सुद्धा दिली. निरोप घेताना अनेक विद्यार्थी भावूक झाल्याचे चित्र दिसून आले.
विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक छोटेखानी कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आला. प्रा. योगेश निंभोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करण्याचे आव्हान केले.

परीक्षेसाठी आणि पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे जितेंद्र पाडवे यांनी आपल्या भाषणात दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या संधी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व, वेळेचे नियोजन, मोबाईल व इतर तंत्रज्ञानाचा सदुपयोग या विषयावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाच्या यशाच्या परंपरेची ओळख प्रमुख पाहुण्यांना करून दिली व विद्यार्थ्यांना खूप शिका मोठे व्हा, आई-वडिलांसोबत गुरुजनांचेही नाव मोठे करा, असे आवाहन केले.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप सपकाळ आपल्या भाषणात म्हणाले की विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात सत्य, जिद्द, चिकाटी व प्रामाणिकता जवळ असेल तर यश संपादनासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास ठेऊन यश संपादन करा, असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री चापे यांनी केले तर आभार कृष्णा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक दिलीप जाधव, प्रदीप कानडजे, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, राजेश ठोंबरे, सुनील सागरे, भास्कर केरले, महादेवी ठवरे, प्रफुल कळम, विकी चांदुरकर, गजानन सपकाळ, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, अक्षय निकम यांनी परिश्रम घेतले. बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.