रेलनावडीत अडवलेला रस्ता मोकळा करण्यासाठी शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : या तालुक्यातील रेलनावडी येथील गट क्रमांक १३४ मधील शेतजमिनीकडे जाणारा अडवलेला रस्ता मोकळा करून अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बापू महादू निकम शेतकऱ्याच्या कुटुंबाने सामाजिक कार्यकर्ते बापू गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

उपोषणास चार दिवस उलटूनही महसूल विभागाचे कुणीही न फिरकल्याने संतप्त झालेल्या निकम कुटुंबाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बॅनर जाळून निषेध व्यक्त केला आहे.

जाणारा गट क्रमांक १३४ मधील शेतजमिनीकडे सार्वजनिक वापराचा रस्ता काही व्यक्तींनी अतिक्रमण करून अडवला आहे. याबाबत यापूर्वी तहसीलदार न्यायालयाने रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेले अपीलही फेटाळण्यात आले आहे. रस्ता मोकळा करून देण्याचा आदेश कायम ठेवण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

मात्र, संबंधित गैरअर्जदारांकडून न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करून रस्ता मोकळा करण्यास टाळाटाळ केली जात असून, सार्वजनिक रस्त्यावर वारंवार अतिक्रमण केले जात असल्याचा आरोप केला आहे. रस्ता अडवून दमदाटी व धमक्या दिल्याबाबतही संबंधितांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. 

शासनाच्या शुद्धिपत्रकानुसार सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ते अडविणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हानोंदविणे, त्यांचे आधार कार्ड व फार्मर आयडी ब्लॉक करणे, तसेच शासकीय लाभ बंद करण्याबाबत तरतूद असल्याचे निवेदनात नमूद करून संबंधित अतिक्रमणधारकांवर अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.  यासंदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सार्वजनिक रस्ता मोकळा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आली आहे.