कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने कांद्याला मिळालेल्या कवडीमोल भावामुळेनैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रभान कचरू गाडे (५६, रा. दत्तमंदिर रोड, लखमापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

चंद्रभान गाडे हे शुक्रवार १५ रोजी रात्री ८ वाजता घरातून बाहेर गेले होते. मात्र, ते रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. शनिवार, १६ रोजी सकाळी गावाजवळील पाझर तलाव परिसरात काही महिला प्रातः विधीसाठी गेल्या असता गाडे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून पासून त्यांना मृत घोषित केले. चंद्रभान गाडे हे अपंग होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. लखमापूर शिवारात एक एकर शेती असून त्यांनी यावर्षी कांद्याची लागवड केली होती. उत्पादन चांगले झाले असतानाही बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याची चिंता त्यांना सतावत होती. 

विविध सेवा संस्थेचे सुमारे २६ हजार रुपये कर्ज तसेच इतर उसनवारीचा ताणही होता. कांदा पिकासाठी झालेला प्रचंड खर्च, आर्थिक अडचणी, बाजारभावातील घसरण, पती पत्नीचे आजारपण तसेच मुलाच्या शिक्षण व लग्नाचा खर्च या सर्व कारणांमुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे लखमापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून न शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.