कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): वैजापूर- नांदूर मधमेश्वर कालव्यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी पंडित शिंदे यांनी नांदूर मधमेश्वर कालवा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील नगिना पिंपळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन सुमारे एक तास चालले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. कालव्याला पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, आंदोलकांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. जाधव यांनी स्वीकारले. 

यावेळी बबन गायकवाड, रावसाहेब सावंत, अनिल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संदीप गुंजाळ, राधाकृष्ण गायकवाड, बबन वाळुंज, संतोष गायकवाड, बाबासाहेब सावंत साहेबराव साळुंके, साहेबराव दिवटे, अशोक दिवटे, संदीप राहींज, भानुदास नाचण, भावलाल मोटे, रमेश मते यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.