दत्तात्रय ढोरमारे
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी केली. यात गहू पिक आघाडीवर आहे. त्याखालोखाल हरभरा पिकाची लागवड आहे.
कृषी विभागाच्या आवाहनानुसार सिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि मका पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र दुप्पट झाले आहे. १९ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली. यंदा पाऊसमान चांगले असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बीत दरवर्षी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पिक म्हणून हरभरा, गहू, मका या पिकांची लागवड करतात. हरभरा पिकाने अनेक शेतकऱ्यांना लखपती केले आहे.
तालुक्यातील रब्बी पेरणीचे हेक्टरी क्षेत्र :
एकूण भौगोलिक क्षेत्र १,२०,०९६, पेरणी युक्त क्षेत्र ९८५३५, यंदा लागवड झालेले क्षेत्र ५५०८८.८, गहू १९६१९ (मागील वर्षी १०४५९), हरभरा २१२८८ (मा.वर्षी २२४७६), मका १२३१६ (मा.वर्षी ६०७६), रब्बी ज्वारी १५०, कांदा बियाणे ३९८, बाजरी ४८, सूर्यफूल ५०, पानकोबी ३१, फुलकोबी ४४, बटाटा ४५, कांदा ८१, वांगी ५१, मिरची ३८, भेंडी ६२, टोमॅटो ७४.८, इतर भाजीपाला ७८५.५.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा गहू, हरभरा लागवडीकडे कल आहे. यंदा शेतकऱ्यांना खरीपात नुकसान सहन करावे लागले. मात्र, दुसरीकडे मुबलक पाणी असल्याने खरिपातील पोकळी रब्बीत भरून काढण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५५ हजार ८८.८ हेक्टरवर रब्बीची पेरणी केली.
यापैकी २१ हजार २८८ हेक्टरवर हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली.
१९ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रात गव्हाची आणि १२ हजार ३१२ हेक्टरवर मका पिकांची लागवड केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभरा उत्पादनात दीडपट वाढ व्हावी म्हणून १८ हजार हेक्टरवर ठिबकवर बेड पद्धतीने हरभरा पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा वापर केला आहे. उत्पन्न वाढणार असून पाण्याची बचत होईल. या लागवडीचा फायदा शेतकऱ्यांना दरवर्षी दिसत असल्याने यंदा दुपटीने बेड पद्धत हरभरा लागवडीत वाढ केली आहे.
मका, हरभरा, सूर्यफूलातून चांगले उत्पन्न घ्यावे :
तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या फरदड घेण्याच्या नादी न लागता मका, हरभरा, सूर्यफूल या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न घ्यावे. सूर्यफुलासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेल घाणे उपलब्ध आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. सूर्यफूल व मका पेरणीसाठी अजूनही दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड करावी.
- संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी
रब्बी लागवडीचे क्षेत्र १४ हजार हेक्टरने वाढले :
तालुक्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यानंतर अहवाल दिलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत दिली. परंतु तरीही शेतकरी न डगमगता रब्बी हंगामासाठी पुन्हा जोमाने उभा राहिला. यामुळे नदी नाल्यांना चांगले पाणी आल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बी लागवडीचे क्षेत्र १४ हजार हेक्टरने वाढले आहे.
















