शेतकर्‍यांना केले रस्त्यावर उभे

Foto
चिकलठाणा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या  व्यवस्थापकाने बँकेचे दार बंद करून ग्राहक शेतकर्‍यांना रस्त्यावर उभे राहण्यास भाग पाडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 
चिकलठाण्याच्या मुख्य रस्त्यावर ही बँक असून खरीप हंगामासाठी कर्ज मिळावे म्हणून शेतकर्‍यांनी बँकेत मोठी गर्दी केली आहे. मृगाचा पाऊस पडल्याने आता जिल्ह्यात सर्वत्र खरीप पेरणीला प्रारंभ झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी सर्वच बँकांमध्ये गर्दी करत आहेत. चिकलठाण्यातील सहकारी बँकेत आज सकाळपासूनच शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. पिक कर्ज तसेच पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांना बँकेने मात्र तुच्छपणाची वागणूक दिली. कोरोना संसर्गाचे परिस्थितीत आलेल्या ग्राहकांना योग्य अंतरावर उभे करून बँकेने तातडीने सुविधा पुरवायला हवी होती. 
मात्र व्यवस्थापकाने अरेरावी करीत बँकेचे दोन्ही गेट बंद केले. विशेष म्हणजे शेतकर्‍यांना उभे राहण्यासाठी आत मोठी जागा उपलब्ध आहे. तरीही मुख्यत गेट बंद केल्याने शेतकर्‍यांना चक्क रस्त्यावरच रांग लावावी लागली.  तासन्तास रस्त्यावर !
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी चिकलठाण्यातील सहकारी बँकेत चकरा मारत आहेत. तासन्तास उभे राहूनही काम होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे कोरोना संसर्गाचे कारण देत व्यवस्थापक कुणालाही बँकेत प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाही. शेतकरी दरवाजा अथवा खिडकीजवळ गेल्यास त्याला चक्क हाकलून लावण्यात येते. बँकेच्या अरेरावीमुळे शेतकर्यात मात्र संतापाचे वातावरण आहे.