सिल्लोड, (प्रतिनिधी) : रहिमाबाद येथील शेत शिवारात गट नं ५३ मध्ये शेतकरी सांडू धोंडीबा पाडळे या शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड जळून जनावरासहित अन्य साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
बुधवारी (दि. २७) रोजी रात्री आठ ते दहा च्या दरम्यान शेतकरी सांडू पाडळे याच्या शेतात २५ ते ३० पत्राचे असलेले पूर्ण शेड जळून खाक झाले. यामधे तीन ते चार शेळ्या, एक बैल (गोहा), गव्हाच्या भरलेल्या ११ ते १२ गोण्या, शेतीसाठी ठेवलेला ठिंबकचा संच व त्या साठी लागणारे पीव्हीसी पाईप व शेतीसाठी लागणारे अवजारे व अन्य संसार उपयोगी साहित्य हे सर्वच जळून खाक झालेले पहावयास मिळाले.
शेतात या वेळी कोणी नसल्यामुळे व सदरील शेड बंद असल्यामुळे जनावरे या मध्ये तडफडून दगावली. घरातील अर्धा अधिक संसार गावातील घर लहान असल्यामुळे मोल मजुरी करणारे शेतकरी शेतातच ठेवतात व तोही जळत असताना पाहून शेतकरी व महिला ओक्साबोक्शी रडत होती हे पाहून इतरांना सुद्धा अश्रू अनावर झालेले पहावयास मिळाले. येथील शिवसेना संघटक सुभाष नवल, शिवसेना शाखा प्रमुख नागेश नवल यांनी शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी या साठी प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. या वेळी शेतकरी विश्वनाथ बनगाळे, नाना राऊत, विष्णू बोडखे व परिसरातील शेतकरी जमा झाले होते.












