वैजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : शहरासह ग्रामीण भागात रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. सायंकाळी ६ वाजेनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले, आणि त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली.

तालुक्यातील गोळवाडी, पालखेड आणि दहेगाव शिवारात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अनेक घरांवरील तसेच कांदा चाळींवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. पालखेड रस्त्यावर अनेक मोठी झाडे कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 

रस्त्यावर झाडे पडल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना  मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.