वैजापुरला डिझेलसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) तालुक्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज वैजापूर शिवूर महामार्गावर खंडाळा येथे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

गेल्या काही दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असून ट्रॅक्टर, पंप आणि इतर कृषी यंत्रसामग्रीसाठी डिझेलची अत्यंत गरज आहे. मात्र
वेळेवर इंधन न मिळाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. 

यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुक्यातील खंडाळा येथे एकत्र येत रस्ता अडवून आंदोलन केले. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. तात्काळ डिझेल पुरवठा सुरू करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. पोलीसांच्या मध्यस्थी करून आंदोलन कर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.