वैजापूर व गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी शेतकरी मिञ प्रतिष्ठानच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान सकाळी सुरू झालेले उपोषण राञी उशिरापर्यंत सुरूच होते. जोपर्यंत नांमकातून आवर्तन सोडण्यात येत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणार्थींनी घेतला आहे. त्यामुळे नांमकाचे पाणी चांगलेच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैजापूर व गंगापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मिञ प्रतिष्ठानच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देऊन नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे. प्रतिष्ठानच्यावतीने निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरवर शेतकऱ्यांची जलदिंडी काढण्यात आली होती. परंतु नाशिक पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात आले नाही. दरम्यान तहसीलदार विनोद गुंडमवार व नांमकाच्या कार्यकारी अभियंता पी.आर. शिरसाठ यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी अगोदर वैजापूर व गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी कालव्यातून सोडा आणि मगच आमच्याशी चर्चा करा. असे अधिकाऱ्यांना सांगितले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.राजीव डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात पंडित शिंदे,संदीप औताडे,युनूस देशमुख,भीमराव चोभे,कृष्णा पाटील,उत्तमराव मेंढकर,गणेश मलिक,दिगंबर थोरे,दगडू माळी,गणेश पोटे,आनंद शेलार, अप्पासाहेब जाधव,रावसाहेब सावंत,ज्ञानेश्वर सावंत,सिकंदर शेख,बाबासाहेब थेटे,माधवानंद महाराज,नंदू सावंत, अप्पासाहेब शिंदे,अनंत भडके,राजीव पवार,भाऊसाहेब जाधव,संपतराव फाळके,लक्ष्मण भुसारे,सुभाष फाळके,बाबासाहेब चोभे,माधव सावंत,ज्ञानेश्वर चौभे,सचिन पुरी,संदीप जाधव,जनार्धन खिल्लारे,बाळू धोत्रे,दिनेश निंबाळकर,अर्जुन मोटे,दादासाहेब मतसागर,पोपटराव पवार,दत्तात्रय पवार,दिगंबर चव्हाण आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.