शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख श्रीकृष्णा राठोड यांची कार अडवून तिघांनी त्यांच्यासह एकावर चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्णा राठोड (रा. बजाजनगर) यांचे वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकाजवळ जयभवानी हॉटेल आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हॉटेल बंद करून श्रीकृष्णा राठोड व मुकेश ऊर्फ मन्नू राठोड हे कारमधून घराकडे निघाले होते. यावेळी त्यांच्या हॉटेललगत असलेल्या भोंडवे पाटील बिअर बार समोर दारू पित बसलेल्या तिघा अनोळखी तरुणांनी राठोड यांची कार अडवून त्यांच्यासोबत वाद घातला. 
दरम्यान, राठोड हे कारमधून खाली उतरताच तिघांनी त्यांना मारहाण सुरू केली. यावेळी राठोड यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिघांपैकी एकाने श्रीकृष्णा राठोड व मुकेश राठोड यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनतंर दोन्ही हल्लेखोर कामगार चौकाच्या दिशेने तर त्यांचा तिसरा साथीदार दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. 
एमआयडीसी वाळूज पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले. या घटनेचा थरार भोंडवे पाटील बिअर बार बाहेर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या फुटेजच्या मदतीने एमआयडीसी वाळूज पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.