छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जुने प्रेमसंबंध तोडल्यानंतर तरुणीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. गोरवाडे यांनी ठोठावली. राकेश प्रशांत ऊर्फ पोपट मोरे (३०, रा. ता. कन्नड,) असे आरोपीचे नाव आहे.
प्रकरणात २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी राकेश मोरे याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी पीडितेचे प्रेमसंबंध होते. मात्र आरोपीचे इतर मुलींशीही संबंध असल्याचे समजल्यानंतर पीडितेने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतर
आरोपीने दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा संबंध ठेवण्यासाठी पीडितेला त्रास देणे सुरु केले. पीडिता ही मामाच्या मुलाच्या लग्नाला जाफराबादेत गेली होती. त्यावेळी आरोपी राकेश मोरे देखील तिच्या पाठोपाठ तेथे गेला. तेथे त्याने संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. ही बाब पीडितेने पुन्हा मामाला सांगितल्यानंतर त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
तरीही आरोपीचा त्रास सुरूच होता. १६ सप्टेंबर २०१९ रोजी तरुणी साई मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी राकेश मोरे याने तिला अडवले व जबरदस्तीने मंदिराच्या मागे नेत लोखंडी हातोड्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. प्रकरणात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवि कलम ३०७अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एस. एम. धुमाळ यांनी काम पाहिले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions









