गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळगाव दिवशी (नन्नवरे मळा) येथील जुना नाशिक महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रकचा अचानक ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला आणि त्यात आग लागून ट्रक पूर्णतः जळून खाक झाला. शिल्लेगाव पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले आहे.
अपघातानंतर काही काळ घटनास्थळी कोणतीही तात्काळ मदत मिळाली नाही, त्यामुळे आग भडकतच गेली. स्थानिक ग्राम सुरक्षा यंत्रणा या गंभीर प्रसंगात पूर्णतः निष्क्रिय ठरली. नागरिकांनी पाण्याच्या बादल्या आणि टँकरच्या साहाय्याने प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग जास्त असल्याने काहीच उपयोग झाला नाही. शेवटी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस व पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले,
दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील माल आणि वाहन पूर्णतः जळून नुकसानग्रस्त झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.