अपघातातील जखमीचा जीव वाचविणार्‍या चौघांवरच काळाचा घाला

Foto
परभणी : येथील बायपास रोडवर झालेल्या स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या अपघातातील जखमी युवकाला चार तरूणांनी सामाजिक बांधिलकी दाखवत रूग्णालयात उपचारासाठी दाखल करत त्याचा जीव वाचविला परंतु चौघेजण रूग्णालयातून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्याने त्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात मानवत रोडवर अंधारवड मारूती मंदिराच्या कमानीसमोर शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. काळ किती क्रूर असतो आणि त्याने  सामाजिक बांधिलकीवरच कसा सूड उगवला याची प्रचिती या अपघातातून दिली.
 
ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा
या दुर्दैवी अपघातात नवनाथ शाम जाधव (४०), विष्णू दत्ता गोरे (२६), प्रल्हाद अशोकराव कुटे (२९) आणि शुभम अप्पाराव दहे (२८, सर्व रा. मानवत) या चार मित्रांवर काळाने एकाच वेळी घाला घातला.   या दुसर्‍या अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णालयात हलवले. या प्रकरणी मयत नवनाथ यांच्या वडीलांच्या फिर्यादीवरून  ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

रुग्णालयात तणाव
घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रॅव्हल्सच्या काचादेखील फोडल्या. शनिवारी सकाळी शवविच्छेदनानंतर एका  नातेवाईकाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.  यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनीही नातेवाईक आणि पोलिस प्रशासनाशी संवाद साधत योग्य समन्वय घडवून आणण्यासाठी मदत केली.