छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सातारा परिसरातील स्त्रीभ्रूण हत्या रॅकेटच्या तपासात मोठे खुलासे होत आहेत. या टोळीने गर्भपातानंतर अर्भक चक्क एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून विल्हेवाट लावण्यासाठी नातेवाइकांच्या हाती सोपवले जात असल्याचे समोर आले आहे. या काळ्या धंद्यातून फरार टोळीने लाखोंची उलढाल केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. कुख्यात डॉ. सुनील राजपूतने जेलमधून सुटताच ही सिंडिकेट सुरू केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्योती आणि राजपूतचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील डॉ. विकास आहेर (निल्लोड) आणि कुख्यात डॉ. सुनील राजपूत यांची वर्षभरापूर्वी भेट झाली होती. लिंगनिदान आणि गर्भपाताचे काम दिले तर आपण भरपूर पैसे कमवू शकतो, अशी गळ राजपूतने घातली होती. त्यानुसार डॉ. आहेर त्याच्याकडे येणार्या गर्भवती महिलांना मुलगा की मुलगी हे तपासायचे आहे का? अशी विचारणा करायचा. महिलेने होकार देताच तो डॉ. राजपूतला संपर्क करायचा. त्यानंतर राजपूत थेट त्या महिलेच्या घरी जाऊन पोर्टेबल मशीनने लिंगनिदान करायचा. जर मुलगी असेल आणि नको असेल, तर गर्भपाताची व्यवस्था असल्याची खात्री तो रुग्णांना द्यायचा.
डॉ. राजपूतची जेलवारी
८ डॉ. सुनील राजपूत हा बीएचएमएस डॉक्टर असून, त्याचे पूर्वी टीव्ही सेंटर भागात क्लिनिक होते. गेल्या ७-८ वर्षांपासून तो नवनवीन डॉक्टरांना हाताशी धरून अवैध गर्भपाताचे सिंडिकेट चालवत आहे. त्याच्यावर यापूर्वीच वाळूजसह अन्य ठिकाणी ३ गुन्हे दाखल असून, तो अनेकदा जेलची हवा खाऊन आला आहे. जेलमधून सुटताच तो पुन्हा याच धंद्यात सक्रिय झाला. ७ वर्षांपूर्वी तो तपासणीसाठी ३ हजार रुपये घ्यायचा, मात्र आता त्याने आपला रेट १५ हजार रुपयांपर्यंत वाढवला होता. ही टोळी एका महिलेच्या गर्भपातासाठी ७० ते ८० हजार रुपये उकळत होती. गेल्या एक ते दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता. डॉ. आहेर याने सिल्लोड येथील एका महिलेला वर्षा जाधवकडे पाठवले असता तिच्या पतीकडून त्याने १५ हजार रुपये ऑनलाईन घेतले होते. मात्र डॉ. राजपूत हा जुना गुन्हेगार असल्याने तो पकडले जाण्याच्या भीतीने फक्त रोख पैसे घेत असे.
नर्स ज्योतीच्या घरातच गर्भपात
८ महिलेला गर्भपात करायचा असल्यास डॉ. राजपूत ज्योती पवारला संपर्क करायचा. ज्योती आणि अटकेतील आरोपी वर्षा जाधव या पूर्वी एका रुग्णालयात नर्स म्हणून एकत्र काम करत होत्या. अनेक वर्षे स्त्रीरोग तज्ज्ञांसोबत काम केल्याने त्यांना गर्भपाताचे, गोळ्यांचे आणि अतिरिक्त स्राव झाल्यास काय करायचे याचे ज्ञान होते. ज्योतीच्या घरातच सर्व यंत्रणा असल्याने तिथेच गर्भपात करायची. तर सातार्यात वर्षा आणि तिची बहीण उज्ज्वला यांच्या घरीही हा जीवघेणा खेळ चालत होता.













