गंगापूरात इच्छुकांची उमेदवारीसाठी फिल्डिंग सुरू 'स्थानिक' च्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचा भेटींवर जोर

Foto

अलिम चाऊस 
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात वर्ष अखेरीस जिल्हा परिषद व नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासंबंधीचा माहोल ग्रामीण आणि गंगापूर शहरी भागात तयार होत असून 'इच्छुक' मंडळी आपापल्या कार्यक्षेत्रात मतदार नोंदणी, जनजागृती व लहान सहान कार्यक्रमांवर सध्या भर देत आहेत. गंगापूर शहरात व तालुक्यातील सर्व ठिकाणी तर दुसरीकडे हेच 'इच्छुक' आपापल्या नेत्याकडे त्यादृष्टीने फिल्डिंग लावून आपल्या कार्याची पावती सादर करत उमेदवारी पक्की करण्याच्या तयारीला लागले आहेत.
स्थानिक स्वराज्य निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार पार पडणार आहेत. जिल्हा परिषद, गंगापूर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून जिल्ह्यात प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिक प्रत्येक वेळी प्रशासनाकडे जाऊन तक्रारी दाखल करू शकत नाही. तसेच प्रशासनाला मर्यादा आहेत. नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे मांडण्यासाठी व त्याचे निकारण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची उणीव तेव्हापासून भासत आली आहे. निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार या महानगरपालिका ,जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सर्व निवडणुका दिवाळीनंतरच होणार आहेत.
निष्ठा, प्रामाणिकपणा मुद्द्यांवरही शहरात व परिसरातील ठिकाणी चर्चा निवडणुकांचे वातावरण तयार होताच 'आयाराम गयाराम' असा कार्यक्रम, सोबतच इकडून तिकडे उड्या मारणारी मंडळी थोड्याच दिवसांत दिसून येणार आहे. 'ज्येष्ठ नेत्यांना नाही सुटले, तर आपल्याला काय' म्हणून या कार्यक्रमात बुडत्या नावेत बसायचे नाही, अशा भूमिकेत काही असल्यामुळे निष्ठा, प्रामाणिकपणा हे मुद्देही चर्चेत येऊ लागले आहेत.

ग्रामीण भागातील विकासाचा वेग संथ ...
जिल्हा परिषद, गंगापूर पंचायत समिती व नगर परिषद येथे गत तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने प्रभागात आणि गावागावांत ठोस विकासकामांचा अभाव दिसून येत आहे. अनेक समस्यांनी नागरिक हैराण असून त्या समस्यांच्या निराकरणासाठी लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सध्या प्रशासनावर कुणाचाच अंकुश नसल्याने पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांच्या अभावाने जनता त्रस्त असल्याचे जाणवत आहे.

पारावरच्या गप्पांतही उमेदवारीची चर्चा … 

शासनाच्या योजना किती व कशा आहेत, त्यासाठी कोणत्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, यासंबंधीचे मार्गदर्शन व त्यासाठी कागदपत्र जमा करण्याचे उपक्रम काहींनी सुरू केले आहे. संपर्क अभियान राबवून कार्यकर्ते तयार करणे, ज्येष्ठांचे आशीर्वाद व इतर फंडे वापरून निवडणुकांचा माहोल तयार होताना दिसत आहे. पारावरच्या गप्पांतही 'जो संपर्कात आहे, सुखदुःखात धावून येतो, त्याला संधी द्यायची'च्या चर्चा सुरू आहेत.