मुंबई : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे फोन सर्व्हिलन्सवर असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी बावनकुळेंवर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. विरोधी नेत्यांचेही फोन टॅप होत असल्याचा राऊतांचा आरोप आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. एका जरी कार्यकर्त्याने बेईमानी केली तर याद राखा, सगळ्यांचे फोन सर्व्हिलन्सवर टाकले आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्ही कोणाशी काय बोलात, कोणाशी काय संवाद साधता ते सगळं आम्हाला कळत आहे, अस खळबळजनक विधान बावनकुळे यांनी केलं. म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन सर्व्हिलन्सवर आहेत, फोन टॅपिंग होतंय. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे. बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असे ते म्हणाले. इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार त्यांच्यालवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे असे राऊत म्हणाले. बावनकुळेंच्या या विधानामुळे चांगलीच खळबळ माजली असून राजकीय वातावरण तापू शकतं.
बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅसिसचं मशीन इथं आणलं आहे स्वत: किंवा भाजप कार्यालयामध्ये लावलं आहे का ? काही खाजगी लोकं लावली आहेत का ? हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोध पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सॲप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितलं आहे. बावनकुळे आणि त्यांची भाजपची टीम, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स जे भाजपसोबत आहेत, नागपूरमधील काही यंत्रणा, या एकत्र येऊन त्यांनी खाजगी वॉर रूम उघडली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
त्या माध्यमातून भाजपचे, शिंदे -मिंधे गटाचे लोकंही त्या सर्व्हिलन्सखाली आहेत. तसेच शिवसेना (ठाकरे गट), शरद पवार गटाचे लोकं, काँग्रेसची लोकं या सर्वांवरती व्हिजिलन्स आहे. हे अत्यंत बेकायदेशीर, घटनाबाह्य कृत्य आहे. आमच्या खाजगी जीवनात घुसण्याचा हा प्रकार आहे, असाही आरोप राऊत यांनी केला.
बावनकुळेंचं वक्तव्य काय ?
भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं बावनकुळे म्हणाले होते. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांना खळबळजनक वक्तव्य केलं. भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकले आहेत, असं ते म्हणाले होते. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते, मात्र त्यांच्या सर्व्हिलन्सच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटू शकतो.