भाराभर मंत्री अन् खोंगभर मदत तिसरे पालकमंत्री शिंदे पाहणार जिल्ह्याचा दुष्काळ !

Foto

औरंगाबाद : गेल्या दोन वर्षात तब्बल तीन पालकमंत्री बदललेल्या जिल्ह्याचा दुष्काळ मात्र आहे तसाच आहे. नव्हे अधिकच गंभीर झालाय. गेल्या नोव्हेंबर महिन्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कन्नड, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री दीपक सावंत यांनी फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. आता तिसर्‍यांदा नवे पालकमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दुष्काळ पाहणी दौर्‍यावर येत आहेत.एवढे मंत्री येऊन गेले तरी शेतकर्‍यांना मदत मात्र मिळाली नाही. त्यामुळेच भाराभर मंत्री अन खोंगभर मदत अशी टीका होत आहे. 

निसर्गाने जसे जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटले तसेच अस्थिर पालकमंत्री मिळाल्याने जिल्हा राजकीय दृष्टया दुष्काळाच्या खाईत सापडला आहे. पालक मंत्री रामदास कदम यांच्या नंतर सलग आणि जिल्ह्याला न्याय देणारा पालकमंत्री लाभला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या अडचणीत भरच पडली. दरम्यान, शासनाने जाहीर केलेले मदतीचे टप्पे अजूनही शेतकर्‍यांच्या पदरात पडले नाहीत. दुष्काळाचा पहिला टप्पा जानेवारी फेब्रुवारी देण्याचे आश्वासन दिलेल्या सरकारला मे महिना उजाडला तरी अजूनही शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करता आली नाही. याची मोठी जबाबदारी पालकमंत्र्यांवर येते. मात्र सततच्या अदलाबदलीने जिल्ह्याला उत्तरदायी ठरणारा पालकमंत्रीच मिळालेला नाही, त्याचा फटका लाखो शेतकर्‍यांना बसला. भराभर मंत्री अन खोंगभर मदत असाच प्रकार घडला. उद्यापासून पालकमंत्री शिंदे दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत.