मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर १७ जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर ७ जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- ( २०२६)
निवडणुकीची अधिसूचना- २५ मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- १ जून
उमेदवारी अर्जांची छाननी- २ जून
अर्ज माघारीची मुदत- ४ जून
मतदान- १८ जून (स.८ ते दु.४)
मतमोजणी- २२ जून